मुंबई : ‘कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काँग्रेस किंवा जेडीएसचे आमदार फोडू शकतात. तसे ते प्रयत्नही नक्कीच करतील.’ असं मत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.


‘राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएसला संधी देणं गरजेचं’

‘काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर कर्नाटकबाबत नेमकी काय खलबतं सुरु आहेत त्याबाबत मला अद्याप तरी फार काही माहित नाही. सर्वसाधारणपणे अशी पद्धत आहे की, मोठा पक्षाला बोलावलं जातं. पण जर पर्यायी सरकार निर्माण होण्याची शक्यता असेल. तर राज्यपाल त्यांना बोलावतात. पण इथं पक्षपातीपणा होऊ शकतो. गोवा, मणिपूरमध्ये तसं झालं देखील. कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी राज्यपालांनी त्यांना संधी देणं गरजेचं आहे. मात्र, केंद्रात भाजपचं सरकार असल्याने इथंही भाजप जोरदार प्रयत्न करतील.’ असंही केतकर म्हणाले.

‘हा सगळा गेम 2019 साठी सुरु आहे’

‘हा सगळा गेम 2019 साठी सुरु आहे. जर या निवडणुकीत भाजपला 90 जागा मिळाल्या  असत्या तर त्यांनी जेडीएससोबत युती करुन सत्ता स्थापन केली असती. त्यावेळस त्यांनी बॅकफूटवर जाऊन जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं असतं. पण आता त्यांना अवघ्या काही जागा कमी पडत आहे. त्यामुळे ते आता साम-दाम-दंड-भेद याचा वापर करु शकतात.’ असं केतकर यावेळी म्हणाले.

‘भाजपने अनेक राजकीय संकेत पायदळी तुडवलेत’

‘गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. पण त्यावेळी तिथे पक्षपातीपणा करण्यात आला. गेल्या चार वर्षात भाजपने तशी रितच केली आहे. अनेक राजकीय संकेत भाजपने पायदळी तुडवले आहेत. यापुढेही ते तुडवले जातील.’ असं म्हणत केतकर यांनी भाजपवर टीका केली.

‘काँग्रेसने अनेक वेळा दुय्यम स्थान स्वीकारलं आहे’

‘काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने अनेक वेळा दुय्यम स्थान स्वीकारुन स्थानिक पक्षाशी युती केल्या आहेत. स्थानिक राजकारण जाणून काँग्रेसने नेहमी आपली भूमिका ठरवली आहे.’ असंही केतकर म्हणाले.

VIDEO :