कोलकाता: आयपीएलच्या रणांगणात आज प्ले ऑफचा एलिमिनेटर सामना खेळवण्यात येईल. ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होईल.
या सामन्यातल्या पराभूत संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर जो संघ जिंकेल त्याचा मुकाबला फायनलच्या तिकिटासाठी सनरायझर्स हैदराबादशी होईल. त्यामुळं या सामन्यात चुरशीचा खेळ पाहायला मिळेल.
दिनेश कार्तिकची कोलकाता नाईट रायडर्स आणि अजिंक्य रहाणेची राजस्थान रॉयल्स.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या दोन फौजा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत, त्या आयपीएलच्या महायुद्धातल्या एलिमिनेटर सामन्यासाठी.
आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघांमधला प्ले ऑफचा सामना म्हणजे एलिमिनेटर मुकाबला. एखाद्या बाद फेरीच्या सामन्यासारखा... हरला तो संपला असा या एलिमिनेटर सामन्याच्या हिशेब असतो. त्यामुळं कोलकाता आणि राजस्थानला एलिमिनेटरमधली हार परवडणारी नाही.
यंदाच्या मोसमात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कोलकात्यानं 2012 आणि 2014 साली आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान 2007 सालच्या पहिल्याच आयपीएल मोसमात विजेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर राजस्थानला विजेतेपद दूरच, पण अंतिम फेरीही गाठता आलेली नाही.
कोलकात्याला यंदा दिनेश कार्तिकच्या रुपानं नवा कर्णधार लाभला. त्याच्या नेतृत्त्वाखाली कोलकात्यानं यंदा चौदापैकी आठ साखळी सामने जिंकून गुणतालिकेत तिसरं स्थान राखलं. त्याउलट राजस्थानला मात्र प्ले ऑफ तिकीटासाठी नशिबाची साथ निर्णायक ठरली.
मुंबई इंडियन्स की, राजस्थान रॉयल्स असा प्रश्न असताना राजस्थाननं चौदापैकी सात सामने जिंकून प्ले ऑफचं तिकीट मिळवलं.
कोलकात्याच्या यंदाच्या यशात कर्णधार दिनेश कार्तिकनं मोलाचं योगदान दिलं. कर्णधार आणि यष्टीरक्षक अशी दुहेरी जबाबदारी त्यानं चोख पार पाडली.
कोलकात्याची फलंदाजी
दिनेश कार्तिकनं यंदाच्या मोसमात कोलकात्याकडून 14 सामन्यांत सर्वाधिक 438 धावांचा रतीब घातला आहे. ख्रिस लिननं 14 सामन्यांत 425, उथप्पानं 346, सुनील नारायणनं 327, रसेलनं 279 आणि नितीश राणानं 264 धावा फटकावल्या आहेत.
कोलकात्याची गोलंदाजी
कोलकात्याच्या आक्रमणाची धुरा सुनील नारायण, कुलदीप यादव, आंद्रे रसेल आणि पियुष चावलानं समर्थपणे सांभाळली आहे.
सुनील चौदा सामन्यात सर्वाधिक 16 फलंदाजांना माघारी धाडून आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं. कुलदीप यादवनं 14, आंद्रे रसेलनं 13 तर पियुष चावलानं 11 विकेट्स काढल्या.
राजस्थानची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सला एलिमिनेटर सामन्यात जॉस बटलर आणि बेन स्टोक्सची उणीव नक्की भासेल.
जॉस बटलरनं राजस्थानकडून 13 सामन्यांत सर्वाधिक 548 धावा फटकावल्या आहेत. स्टोक्सनं 169 धावा आणि 8 विकेट्स अशी अष्टपैलू बजावली होती. पण पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंड संघात समावेश झाल्यानं त्यांना मायदेशी परतावं लागलं आहे. परिणामी राजस्थानच्या दृष्टीनं करो या मरोची एलिमिनेटर लढाई आणखी अवघड झाली आहे.
या परिस्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणेला आपला खेळ आणखी उंचावावा लागेल.
यंदाच्या मोसमात रहाणेनं 14 सामन्यांत एका अर्धशतकासह 324 धावा केल्या आहेत.
राजस्थानची गोलंदाजी
राजस्थानचं आक्रमणही या मोसमात फारसं प्रभावी ठरलं नाही. साडेअकरा कोटींची बोली लागलेला जयदेव उनाडकट आणि साडेबारा कोटींची बोली लागलेला बेन स्टोक्स यांना त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आली नाही. उनाडकटच्या खात्यात 11 तर स्टोक्सच्या खात्यात आठ विकेट्सची नोंद आहे. पण नवख्या जोफ्रा आर्चरनं नऊ सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेऊन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कृष्णाप्पा गौतम आणि श्रेयस गोपालनं अनुक्रमे 9 आणि 10 विकेट्स घेऊन राजस्थानच्या यशात आपला वाटा उचलला.
कोणाचं पारडं जड?
आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थानच्या तुलनेत कोलकात्याचं पारडं कागदावर तरी लय भारी दिसत आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकत असतो. त्यामुळं राजस्थान रॉयल्सलाही अगदीच मोडीत काढता येणार नाही.
IPL: कोलकाता की राजस्थान? हरला तो संपला!
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 May 2018 12:57 PM (IST)
ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यातल्या पराभूत संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -