शाईचं पेन, बॉलपेन वगैरे पेनांपासून ते थेट कॉम्प्युटरवर लिहिता येण्याचा प्रवास माझ्या पिढीने पाहिला. काही दिवसांपासून मी कॉम्प्युटरला लिहिण्याचा मजकूर ‘डिक्टेट’ करण्यास सुरुवात केली. हा एक मजेशीर अनुभव होता. मनात ज्या वेगाने विचार, कल्पना येतात त्या वेगाशी लिहिण्याचा वेग मेळ खात नाही, हा अनुभव अनेकदा घेतला होता. दिवसभरात जास्तीत जास्त किती तास बैठक मारून पेनाने लिहू शकू वा हातांनी टंकू शकू, याला प्रचंड मर्यादा तर होत्याच; खेरीज या बैठ्या कामांमुळे शारीरिक दुखणीही सुरू होतातच. लिहिण्याच्या वेगाहून मनातलं बोलण्याचा वेग कितीतरी जास्त आहे, हे मी कॉम्प्युटरला ‘डिक्टेट’ करू लागल्यानंतर ध्यानात आलं. अर्थात त्यासाठी जे काही लिहायचं आहे, ते आपल्या मनात अगदी स्पष्ट, स्वच्छ असलं पाहिजे हे बाकी खरं. मला अजून तरी ही अडचण कधी जाणवलेली नसल्याने प्रश्न उद्भवला नाही. दुसऱ्या एका तंत्राने जुने संदर्भ नव्याने टाईप करून घेत बसण्याचं आणि हाताने लिहिलेलं टाईप करण्याचं कामही कमी केलं. स्कॅन केलेला मजकूर युनिकोडमध्ये रुपांतरीत करून देणारं एक सॉफ्टवेअर हाती लागलं. या तंत्रज्ञानाचा आनंद घेत असतानाच अजून दोन बातम्या हाती आल्या.
पहिली बातमी डॉ. दिना कटाबी या तरुणीने बिनतारी संदेशवहनात केलेल्या संशोधनाची आहे. “माणसाच्या अंगावर जाऊन आदळणाऱ्या रेडीओलहरी जेव्हा परत येतात, तेव्हा त्यांचं विश्लेषण करून त्या माणसाच्या भावावस्थेचा अंदाज घेता येऊ शकतो,” असा निष्कर्ष सांगणारा एक शोधनिबंध तिने लिहिला. त्यावर आधारित यंत्रही निर्माण केलं. भिंतीपलीकडे एखाद्या माणसाला थांबवून या यंत्राच्या मदतीने त्याच्या मनातल्या खळबळी टिपता येऊ लागल्या. या उपकरणावर ती अजून काम करते आहेच, त्यातून अधिक अद्भुत असं काही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देहबोली ‘वाचून’ अंदाज बांधणारी माणसं असतातच, पण त्यांना शब्द न शब्द वाचता येत नाही अर्थात. आता कॉम्प्युटरच्या मदतीने मनातला एकेक शब्द टिपता येणारं तंत्रज्ञानदेखील येऊ घातलंय. दुसरी बातमी ही या ‘अल्टर इगो’ तंत्राची आहे आणि हे तंत्र विकसित करणाऱ्या गटाचं नेतृत्व अर्णव कपूर नावाचा भारतीय तरुण करत आहे, ही त्यातली आनंदात भर घालणारी गोष्ट. आता हे ‘अल्टर इगो’ प्रकरण काय आहे? तर कानामागे डकवून ओठांपर्यंत येणारं एक उपकरण कॉम्प्युटरला जोडलेलं असतं, ते आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं. मनात आपण जे काही स्वत:शी ‘बोलतो’ ते सगळे शब्द हे उपकरण टिपतं. हे घडतं कसं? तर आपण मनातल्या मनात जरी बोलत असलो तरी त्या बोलण्याने काही सूक्ष्म शारीरिक हालचाली होतच असतात. जबडा व बाकी चेहरा यांच्यामध्ये मज्जासंस्था व स्नायूंशी संबंधित विविध ‘न्यूरोमस्क्युलर संदेश’ या हालचाली निर्माण करतात. डोळ्यांना न दिसणारे, स्पर्शांना न जाणवणारे, किंबहुना व्यक्तीला स्वत:लाही न कळणारे असे हे सूक्ष्म संदेश ‘अल्टर इगो’मधले इलेक्ट्रोड्स टिपतात आणि कॉम्प्युटरमध्ये जमा करतात. त्या संदेशांचे अर्थ लावून नेमके शब्द लिहून काढण्याचं पुढचं काम कॉम्प्युटर करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांची निर्मिती करण्याच्या विविध प्रयत्नांमधला हा एक प्रयत्न होता आणि तो अनेक प्रयोगांनंतर यशस्वी ठरला हे विशेष.
लेखकांना मनातलं वेगाने लिहून काढता येणं हा फायदा अर्थातच गमतीचा आहे आणि मर्यादित तर आहेच आहे. लेखक नसलेल्या लाखो लोकांना त्याचा काय उपयोग होईल हे अधिक महत्त्वाचं. आपल्या मनातलं सगळं असं टिपून काढलं तर वेगाने येऊन जाणाऱ्या अनेक भावना, ज्या आपल्यालाही स्पष्ट उलगडलेल्या नसतात, त्याही स्पष्ट होत जातील. ‘मला असं वाटत नव्हतं’ किंवा ‘मला वेगळंच काही म्हणायचं होतं’ अशी स्पष्टीकरणं आपण अनेकदा स्वत:लाही देत असतो आणि स्वत:शीही खोटं वागण्याचा फिजूल प्रयत्न करत असतो, तो यामुळे व्यर्थ ठरेल. ‘अल्टर इगो’ हा मनाचा आरसा असल्याने आपल्या भावनांची तीव्रता आणि आपल्या विचारांमधले गोंधळ / स्पष्टता / विरोधाभास वगैरे स्पष्ट होत जातील. त्यातून आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, हे ओळखण्यास मदत होईल आणि त्यानुसार स्वत:तील कौशल्यं वाढवता येतील व दोष दूर करता येतील. कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे असतात, तसे तोटेही असतातच. या फायद्यातोट्याचे असे शेकडो कल्पनाविलास करता येतील. या बदलाला लोक कसं स्वीकारतील, कसं सामोरं जातील, हे काळच ठरवेल. मला धास्ती वाटतेय ती त्यापुढच्या टप्प्याची.
आज साधं टाईप करताना एक अक्षर टंकताच शब्दांचे पर्याय समोर येतात; एका इमेलला उत्तर द्यायचं म्हटलं की कॉम्प्युटर ते मेल आधीच वाचून उत्तरांचे पर्याय भराभर सुचवतं; तसं मनात एक शब्द उमटताच तुमचे पुढचे विचार वा पुढच्या कल्पना काय असतील हेही कॉम्प्युटर ठरवू लागला, तर किती घोळ होतील?