कोलकाता: रॉबिन उथप्पा, मनीष पांडे आणि युसूफ पठाणच्या धडाकेबाज फलंदाजीनं आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 17 धावांनी मात केली.


ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात कोलकात्यानं हैदराबादला विजयासाठी 20 षटकांत 173 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हैदराबादला 20 षटकांत सहा बाद 155 धावांचीच मजल मारता आली. कोलकात्याचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. या विजयासह कोलकात्यानं गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

कोलकात्याच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली ती उथप्पा, मनिष पांडे आणि युसूफ पठाण ही त्रयी. उथप्पा आणि मनिष पांडेनं तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची, तर पांडे आणि युसूफ पठाणनं चौथ्या विकेटसाठी 36 धावांची झटपट भागीदारी रचली.

उथप्पानं 39 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह 68 धावांची खेळी उभारली. पांडेनं 35 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 46 धावांची, तर युसूफ पठाणनं 15 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 21 धावांची खेळी केली.

त्यानंतर हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांना चांगला स्टार्ट मिळून, त्यावर डावाची उभारणी करता आली नाही. त्यामुळं या सामन्यात कोलकात्याला निर्णायक विजय मिळवता आला.