नाशिक: समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे गेले. पण त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
‘आधी मंत्रिपदं सोडा आणि मग आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या.’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. नाशिकच्या शिवडे इथं हा प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या आक्रमक प्रश्नांमुळे खासदार हेमंत गोडसे नि:शब्द झाले आणि त्यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं.
गेला काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. शिवडे गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या भागात आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे आहेत. मात्र, यापैकी कुणीही अधिकाऱ्यांशी चर्चा करायला आलं नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांची भेट घ्यायला आलेल्या खासदार गोडसे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
मुंबई नागपूर या प्रस्तावित समृद्धी मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 10 जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक गावांनी समृद्धी महामार्गाविरोधात एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची आज शिवडे गावात बैठक झाली.
या बैठीकीत ठाणे, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबासह 10 जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत सुपीक जमीन द्यायची नाही, असा ठराव या बैठकीत एकमतानं संमत करण्यात आला. 26 एप्रिलला शहापूर इथं दहाही जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन जनआंदोलन उभं करणार आहेत.
दरम्यान, या बैठकीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘आम्ही रस्त्यावर आलोय. तशी तुमची मुलं रस्त्यावर आणू नका’, अशी साद या मुलांनी घातली आणि अनेकांना अश्रू अनावर झाले.
संबंधित बातम्या: