नवी दिल्ली: मनीष पांडेनं 49 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी करून, आयपीएलच्या रणांगणात कोलकाता नाईट रायडर्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर चार विकेट्सनी रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात दिल्लीनं कोलकात्याला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची तीन बाद 21 अशी केविलवाणी अवस्था झाली.
त्या परिस्थितीत मनीष पांडेनं आधी युसूफ पठाणच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचून कोलकात्याच्या डावाला स्थैर्य दिलं. त्यानंतरही त्यानं एक खिंड लावून धरली. अखेरच्या तीन चेंडूंवर कोलकात्याला विजयासाठी आठ धावांची गरज असताना, मनीष पांडे अमित मिश्राच्या गोलंदाजीवर तुटून पडला. त्यानं आधी षटकार आणि मग दोन धावा वसूल करून कोलकात्याला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला.
मनीष पांडेनं नाबाद 69 धावांची खेळी चार चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. युसूफ पठाणनं 39 चेंडूंत सहा आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी उभारली. कोलकात्याकडून नॅथन कूल्टर-नाईलनं प्रभावी गोलंदाजी केली. त्यानं चार षटकांत 22 धावा मोजून दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.