'संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांनी एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली आणि संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. मात्र, याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.' असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. ते आज चंद्रपूरमध्ये बोलत होते.


'महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोठी आहे. खडसे यांच्या फार्महाऊस समोर विरोधकांची सभा झाली. त्यामुळे खडसेंनी त्यांना चहा-पानाला बोलावलं. राज्यात भाजपला वाढविण्यात खडसेंची भूमिका मोठी आहे. त्यामुळे ते पक्ष सोडून जाऊ शकत नाही.' असंही मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये विरोधकांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली होती. आणि कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

 मुक्ताईनगरमध्ये खडसेंकडून विरोधकांचं स्वागत

शेतकरी कर्जमाफीसाठी निघलेली संघर्ष यात्रा भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे 15 एप्रिलला पोहचली होती. यावेळी खडसेंच्या फार्म हाऊसवर अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी खडसेंची भेट घेतली होती. पण ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं होतं.

संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक फडणवीस सरकारला अडचणीत आणत असतान दुसरीकडे खडसें यांच्या घरी विरोधकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सुरवात झाली. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांची कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.

संबंधित बातम्या:

मुक्ताईनगरमध्ये खडसेंकडून विरोधकांचं स्वागत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण