मुंबई : क्रिकेटचा धर्मग्रंथ अशी ओळख असलेल्या विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर यंदा विराट कोहलीला स्थान मिळणार आहे. एप्रिलमध्ये प्रकाशित होणाऱ्या विस्डेनच्या आवृत्तीवर विराटचा रिव्हर्स स्वीप शॉट मारतानाचा फोटो छापला जाणार आहे.
विस्डेन मासिकाच्या मुखपृष्ठावर छायाचित्र प्रसिद्ध होणारा विराट हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी 2014 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर त्याचा फोटो विस्डेनच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता.
कसोटी, वन डे आणि टी ट्वेंटी या तिनही प्रकारांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने त्याच्या कारकीर्दीतली सर्वोच्च 235 धावांची पारी खेळली होती. या इनिंगमधील रिव्हर्स स्वीप मारतानाचा फोटो कव्हर पेजवर छापण्यात येणार आहे.
विराटपूर्वी 2014 मध्ये सचिनचा फोटो या मासिकाच्या कव्हर पेजवर छापण्यात आला होता. सचिनने खेळलेल्या अखेरच्या कसोटीतील फोटो त्यामध्ये छापण्यात आला होता.