मुंबई : "अमित शाह यांना सांगतो, तुम्ही तुमच्या संकटकाळी पाठीशी उभा राहणारा मित्र गमावलेला आहात.
ये फ्रेंडली मॅच नही है, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे.", असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंबईतील गिरगावमध्ये उद्धव ठाकरेंनी पहिली प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.


...अन्यथा मेट्रोवर फुली : उद्धव ठाकरे

मेट्रोचा आराखडा पूर्ण नाही. त्यात मार्ग, स्टेशन दाखवता, मग गिरगावकारांना घर कुठे देणार, हे नाकाशात का दाखवत नाही?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मेट्रोच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर, मेट्रोचं प्रेझेन्टेशन तिथल्या लोकांना दाखवा, त्यानं मान्य असेल तर मेट्रो होईल, नाहीतर मेट्रोवर फुली, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

"विकास नको म्हणणारे आम्ही कर्मदरिद्री नाही, पण आमचे थडगे बांधून विकास करणार असाल, तर तुमच्या बिल्डिंग उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.", असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

श्रीपाल सबनीस यांचे जाहीर आभार

महाराष्ट्राच्या नकाशाचे तुकडे करु नका, असं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर व्यासपीठावरुन निर्भीडपणे बोलणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्या धाडसाचं कौतुक आणि त्यांचे जाहीर आभार, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना मतदान करणार का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना विचारला.

"लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान फिरतायेत, कारभाराकडे लक्ष कुठेय? मोदी बाजार उद्यान समितीचे अध्यक्ष देखील होऊ शकतील", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

काँग्रेसवरही टीका

काँग्रेसच्या होर्डिंग्जवर खड्डेच दिसतात. काँग्रेसला खड्ड्यातच जायचंय. शेवटी जिथे जायचंय तेच दिसणार, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केली. अख्खा देश काँग्रेसने खड्ड्यात घातला आणि आता देशवासियांनी यांना खड्ड्यात घातलं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • लोकशाहीतल्या लढाईला सुरुवात - उद्धव ठाकरे

  • पारदर्शकतेचा मुद्दा अर्थमंत्रालयाने टराटरा फाडला - उद्धव ठाकरे

  • शिखंडी कोण, पाखंडी कोण हे कळू द्या - उद्धव ठाकरे

  • घसा बसेपर्यंत मुख्यमंत्र्यांची आरडाओरड - उद्धव ठाकरे

  • मुंबईमधील कामं शिवसेनेने केली, भाजपचा त्यात सहभाग नाही - उद्धव ठाकरे

  • बुरहान वानीच्या भावाला पैसे देत असाल, तर भाजपशी मतभेद आहेतच - उद्धव ठाकरे

  • सोसायटीच्या निवडणुकींनाही मुख्यमंत्री फिरतायेत - उद्धव ठाकरे

  • काँग्रेसला खड्डेच दिसतात, कारण त्यांना त्यातच जायचंय - उद्धव ठाकरे

  • उद्धव ठाकरेंच्या सभेला गिरगावात तुफान गर्दी

  • मुख्यमंत्री बुद्धिमान असल्याचे दाखवण्यासाठी भाषणात जोडाक्षरं वापरतात - उद्धव ठाकरे

  • शिवसेनेचा एकतरी मुद्दा खोडून दाखवा - उद्धव ठाकरे

  • मेट्रो आणून भाजप उपकार करत नाहीय - उद्धव ठाकरे

  • वचननाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवताय, याचा अर्थ मुंबई तुम्हाला समजली नाही - उद्धव ठाकरे

  • मंगळावरही भाजपचे 5 लाख सदस्य आहे, हा इंटरनॅशनल पक्ष आहे - उद्धव ठाकरे

  • मोदी बाजार उद्यान समितीचेही अध्यक्ष होऊ शकतील, भाजपकडे दुसरा चेहराच नाही - उद्धव ठाकरे

  • बँकेतल्या रांगेत गरीब माणूस मेला, कुणी श्रीमंत मेला नाही - उद्धव ठाकरे

  • शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची शिवसेनेची मागणी - उद्धव ठाकरे

  • महाराष्ट्राच्या नकाशाचे तुकडे करु नका, हे श्रीपाल सबनीसांचं वाक्य महत्त्वाचं - उद्धव ठाकरे

  • मुंबईच्या गळ्याला हात जरी लावला, तरी उभं चिरु - उद्धव ठाकरे

  • गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरं तुंबली, मात्र मुंबई तुंबली नाही - उद्धव ठाकरे

  • शिवसेनेने केलेल्या कामांवर बोलून दाखवा, आव्हान देतो - उद्धव ठाकरे

  • महाराष्ट्र तोडणाऱ्यांना उभं चिरणार - उद्धव ठाकरे

  • सडेतोड भूमिका घेणारे साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे जाहीर आभार मानतो - उद्धव ठाकरे

  • थडगी बांधून बिल्डिंग उभ्या राहत असतील, तर बांधू देणार नाही - उद्धव ठाकरे

  • मुंबईकरांना बेघर करणारा विकास आम्हाला नको - उद्धव ठाकरे

  • आरोप तरी चांगले करा, बोबडे आरोप का करताय? - उद्धव ठाकरे

  • शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात बोलणारे संपतात, हा इतिहास आहे - उद्धव ठाकरे

  • भाजपने त्यांच्या पारदर्शकतेचं काय, ते सांगावं - उद्धव ठाकरे

  • युतीच्या जोखडातून बाहेर पडलोय, आता युतीच्या राजकारणात पडायचं नाही - उद्धव ठाकरे

  • ही प्रचाराची नाही, विजयाची सभा आहे - उद्धव ठाकरे

  • शिवसेनाप्रमुख नसते, तर गोध्रानंतर मोदींचं काय झालं असतं, हा विचार करा - उद्धव ठाकरे

  • ये फ्रेंडली मॅच नहीं है, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे. - उद्धव ठाकरे