कोल्हापूर : तुटलेल्या ऊसातील प्रतिटन 400 रुपयांच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एल्गार सुरु आहे. दरावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात एल्गार सुरु केला आहे. 



स्वाभिमानीकडून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 2005/06 मोसमामध्येही राजू शेट्टी यांनी हायवे रोखून साखरसम्राटांना दर देण्यासाठी भाग पाडले होते. आता पुन्हा एकदा हायवेवर चक्काजाम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 



हायवेवर चक्काजाम सुरु 


राजू शेट्टी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एकटं पाडलं नसल्याचे सांगितले. कारखानदार आणि सरकारची गट्टी झाल्याचा आरोप त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही लढत असताना दखल घेतली नसल्याचे ते म्हणाले. 



विरोधी पक्षांनी सुद्धा डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. शेट्टी यांनी सर्व कारखाने बंद असल्याचा दावा केला. दुसरीकडे, आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी म्हणून शिरोळ आणि जयसिंगपूरमधील संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  



पोलिसांकडून तगडा बंदोबस्त, वाहतूक वळवली  


दरम्यान, हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर आता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनलस्थळी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. 


सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू


राजू शेट्टी यांनी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गतवर्षीच्या उसाला प्रतिटन शंभर रुपये साखर कारखान्यांनी आणि तीनशे रुपये सरकारने द्यावेत, कारखान्यांनी शंभर रुपयांपेक्षा जादा रकमेचा दुसरा हप्ता द्यावा आणि खुशाल साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले


इतर महत्वाच्या बातम्या