Indian Cricket Team : वर्ल्डकपमध्ये धुवाँधार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियाला आपली निराशा लपवता आली नाही. अनेक खेळाडूंना आपल्या भावना अनावर झाल्या. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेण्यावर अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते भारतीय ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटले आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटर किर्ती आझाद यांनी पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये जाण्याऐवजी एका खासगी ठिकाणी खेळाडूंना भेटायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.  कीर्ती आझाद यांनी भारतासाठी सात कसोटी आणि 25 वनडे खेळले आहेत.


64 वर्षीय कीर्ती आझाद यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आयसीसीला टॅग करत पोस्ट केली आणि लिहिले की, 'ड्रेसिंग रूम हे कोणत्याही संघासाठी पवित्र स्थान असते. आयसीसी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशिवाय कोणालाही प्रवेश देत नाही. भारताच्या पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुमच्या बाहेर खासगी परिसरात संघाला भेटायला हवे होते. आझाद यांनी असेही लिहिले की, 'मी हा विचार राजकारणी म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून मांडत आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये, ड्रेसिंग रूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये येऊ दिले असते का? राजकारण्यांपेक्षा खेळाडू अधिक शिस्तप्रिय असतात.






आझादने दुसर्‍या पोस्टमध्ये लिहिले की, 'शेवटी आणखी एक मोठी गोष्ट भारताला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या व्यक्तीला आणि संघाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. आता सांगा राजकारण कोण करतंय? 1983 च्या विश्वचषकात भारताला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणारा कर्णधार कपिल देव 2023 च्या विश्वचषक फायनलमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांनी एबीपी न्यूजशी बोलताना या मेगा इव्हेंटमध्ये का हजेरी लावली नाही याचा खुलासा केला.






कपिल देव म्हणाले, 'मला तिथं आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्याने मला फोन केला नाही म्हणून मी गेलो नाही. ही साधी बाब आहे. 1983 च्या विश्वचषकाच्या संपूर्ण संघाने माझ्यासोबत जावे अशी माझी इच्छा होती, पण कदाचित एवढी मोठी स्पर्धा असल्याने लोक जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतील. कदाचित ते विसरले असतील.






दरम्यान, भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक विजेतेपदापासून वंचित राहिला आणि आता पुढील मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना गुरुवारी होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या