मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं. स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या युसूफचा 2011 साली कोलकात्याच्या संघात समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत कोलकात्याचा संघ केवळ दोन वेळा युसूफशिवाय मैदानात उतरला आहे.


अंतिम सामन्यात खेळण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या कोलकात्याने महत्वपूर्ण सामन्यात युसूफला विश्रांती दिली. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर सहा विकेट्स राखून मात केली.

कोलकात्याने या सामन्यात दोन बदल केले होते. युसूफ पठाणच्या जागी अंकित राजपूत आणि ट्रेंट बोल्टऐवजी कोलिन डी ग्रँडहोमला संधी देण्यात आली होती.

यंदाच्या आयपीएल मोसमात युसूफला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात केवळ 143 धावा केल्या.

गोलंदाजीमध्येही युसूफला काही खास कामगिरी बजावता आली नाही. त्याने या आयपीएल मोसमात 4 षटकं गोलंदाजी केली, ज्यामध्ये 41 धावा देऊन एक विकेट त्याच्या नावावर आहे.

युसूफला यापूर्वी 2014 साली राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं होतं. आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजे 2008 ते 2010 या काळात युसूफने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व केलं. तर 2011 पासून तो कोलकात्यासाठी खेळत आहे.