मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी पुन्हा महाराष्ट्र डर्बी पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरच्या या लढाईत स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होईल.
पुण्याने क्वालिफायर वन सामन्यात मुंबईला हरवून आधीच फायनलमध्ये धडक मारली होती. तर मुंबईने क्वालिफायर टू सामन्यात कोलकात्याला हरवून फायनलचं तिकीट आपल्या हातून निसटू दिलं नाही.
ट्वेन्टी ट्वेन्टीचा नवा चॅम्पियन कोण?
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचा रथ मजल दरमजल करत आता हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दाखल झाला आहे. हैदराबादच्या याच रणांगणात रविवारी आयपीएलच्या महायुद्धातली आखरी जंग होणार आहे. हीच लढाई आयपीएलच्या विजेतेपदाचा नवा मानकरी आणि ट्वेन्टी ट्वेन्टीचा नवा चॅम्पियन ठरवणार आहे.
विजेतेपदाच्या या लढाईत एका बाजूला आयपीएलची सुपरजायंट फौज रायझिंग पुणे, तर दुसऱ्या बाजूला यंदाची सुपर परफॉर्मर टीम मुंबई इंडियन्स आहे.
आयपीएलच्या इतिहासात पुण्याचा हा केवळ दुसराच मोसम आहे. पण दुसऱ्याच मोसमात पुण्याने फायनलमध्ये धडक मारून आपण आयपीएलचा रायझिंग सुपरजायंट असल्याचं दाखवून दिलं. मुंबईची आयपीएलची फायनल गाठण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईने याआधी 2010, 2013 आणि 2015 साली आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं होतं. तसंच 2013 आणि 2015 साली मुंबईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नावही कोरलं.
यंदाच्या मोसमातही मुंबईने सोळापैकी अकरा सामने जिंकून सर्वाधिक विजय साजरे करण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण पुणेही मुंबईपेक्षा फार पिछाडीवर नाही. पुण्याच्या खात्यात पंधरापैकी दहा सामन्यांमध्ये विजय आहे. त्याच पुण्याने साखळीतल्या दोन आणि प्ले ऑफच्या क्वालिफायर सामन्यात मिळून मुंबईला तीनपैकी तिन्ही सामन्यांमध्ये हरवण्याची कामगिरी बजावली आहे.
आता विजेतेपदाची लढाई जिंकून, पुण्याकडून झालेल्या त्या तिन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी मुंबई साधणार का, याचीच उत्सुकता आयपीएलच्या चाहत्यांना लागली आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमात फलंदाजी हे मुंबईचं बलस्थान ठरलं. नितीश राणासारखा 13 सामन्यांमध्ये 333 धावांचा रतीब घालणारा, तसंच अधूनमधून मॅचविनिंग खेळी करणारा फलंदाज सध्या डगआऊटमध्ये बसतो यातून मुंबईच्या फलंदाजीची ताकद दिसून येते.
मुंबईची ही फलंदाजी कधी कधी बेभरवशाचीही ठरू शकते याची प्रचीती क्वालिफायर वन सामन्यात आली. वानखेडेवरच्या त्या सामन्यात मुंबईला 163 धावांच्या लक्ष्याचाही पाठलाग करता आला नव्हता.
मुंबई इंडियन्स विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरणार?
आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरायचं तर मुंबईच्या पार्थिव पटेल, कायरन पोलार्ड, रोहित शर्मा आणि लेण्डल सिमन्स या चार फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावावी लागेल. तळाला हार्दिक आणि कृणाल पंड्याचा सातत्यपूर्ण वाटाही मुंबईच्या दृष्टीने मोलाचा ठरणार आहे.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ, राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी आणि महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म पुण्याच्या दृष्टीने फलंदाजीत जमेची बाजू असेल. पण अष्टपैलू बेन स्टोक्स आणि लेग स्पिनर इम्रान ताहिर माघारी परतल्याने पुण्याच्या फौजेतला समतोलपणा मात्र कमी झाला आहे.
अर्थात वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरने क्वालिफायर वन सामन्यात मुंबईला नऊ बाद 142 धावांत रोखून पुण्याला स्टोक्स आणि ताहिरची उणीव भासू दिली नाही. पण फायनलमध्ये मुंबईला पुन्हा रोखायचं, तर जयदेव उनाडकट, डॅनियल ख्रिस्तियन आणि अॅडम झाम्पासह सुंदर आणि शार्दूललाही कंबर कसावी लागेल.
क्वालिफायर टू सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला अवघ्या 107 धावांत रोखल्याने कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास दुणावला आहे. मिचेल जॉन्सन आणि लसिथ मलिंगासारखे आंतरराष्ट्रीय स्टार हाताशी असणं हे रोहितचं भाग्य आहेच, पण जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या हाणामारीच्या षटकांत कमालीचा टिच्चून मारा करतात.
हरभजन सिंहसारख्या अनुभवी शिलेदाराला विश्रांती देऊनही, कर्ण शर्मा आणि कृणाल पंड्याने मुंबईच्या फिरकीची धार कमी होऊ दिलेली नाही. हाच कर्ण शर्मा क्वालिफायर टू सामन्यात मुंबईच्या विजयाचा एक शिल्पकारही ठरला.
तोच कर्ण शर्मा आणि त्याचे सहकारी त्यांच्या मुंबई इंडियन्सला आणखी एक विजय आणि विजेतेपदाची झळाळती ट्रॉफी मिळवून देण्याच्या इराद्याने रविवारी हैदराबादच्या रणांगणात उतरतील. पण समोर उभ्या ठाकलेल्या पुण्याच्या सुपरजायंटचाही तोच इरादा पक्का आहे. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी होणारी महाराष्ट्र डर्बी ही चुरशीची ठरेल, यात शंका नाही.