उल्हासनगरमध्ये चोरीचा आळ घेत दोन मुलांचं मुंडन, दुकानदारावर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 08:26 AM (IST)
उल्हासनगर : चोरीचा आळ घेत दोन लहान मुलांचं अर्ध मुंडण करुन त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याची धक्कादायक घटना उल्हासगनरमध्ये घडली आहे. या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक मधलील प्रेमनगर टेकडी परिसरात ही घटना घडली आहे. पठाण नावाच्या दुकानदारानं हे तालिबानी कृत्यं केलं आहे. या दुकानदारानं दोन मुलांवर चोरीचा आळ घेऊन मारहाण केली. आणि त्यांचं अर्धमुंडन करुन त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला होता. या घटनेनंतर मुलांच्या आईनं पोलिसांत धाव घेत, दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलांच्या आईच्या तक्रारीवरुन दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यात मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजुतीतून, दोन अल्पवयीन मुलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी वारजे पोलिसांनी मुलीचे वडील आणि तिच्या भावासह पाच जणांना अटक केली होती.