इंदूर : कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबने पुण्यावर 6 गडी राखून मात केली.

कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंटने किंग्स इलेव्हन पंजाबला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाबने सहा चेंडू राखून पूर्ण केलं.

ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीने पुण्याचे गोलंदाज हतबल झाले. मॅक्सवेलने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने 27 चेंडूत नाबाद 30 धावा करत महत्वाची भूमिका निभावली. पुण्याचा फिरकीपटू इम्रान ताहीरने 2, तर अशोक डिंडा आणि राहुल चहार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्याआधी सलामीवीर हाशिम आमला (28) आणि मनन वोहरा (14) यांनी पंजाबच्या डावाची शानदार सुरुवात केली. रिद्धीमान साहा (14) आणि अक्षर पटेल (24) यांनीही महत्वाचं योगदान दिलं.

पुण्याला बेन स्टोक्स (50) आणि मनोज तिवारी (40) यांच्या भागीदारीच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारता आली.

पुण्याला सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालच्या रुपाने पहिलाच धक्का बसला. मयंक खातं न उघडताच माघारी परतला. त्यानतंर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे 19, तर स्मिथ 26 धावांवर बाद झाला.

पुण्याचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीलाही खास कामगिरी करता आली नाही. 11 चेंडूत केवळ 5 धावा करुन धोनी माघारी परतला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि मनोज तिवारी यांनी पुण्याची धुरा सांभाळली.

डॅनियल ख्रिश्चनच्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीने पुण्याने 163 धावांपर्यंत मजल मारली. डॅनियल ख्रिश्चनने 8 चेंडूत 17 धावा ठोकल्या.