कराची: पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक पाठोपाठ आता हुकमी फलंदाज आणि माजी कर्णधार युनीस खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर युनीस खान आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
"सध्या निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक खेळाडूला हा निर्णय घ्यावाच लागतो", असं युनीस खान म्हणाला.
युनीस खानने वन डे, कसोटी आणि टी ट्वेण्टी अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारात पाकिस्तानचं नेतृत्त्व केलं आहे. इतकंच नाही तर युनीस खानच्याच नेतृत्त्वात पाकिस्तानने 2009 मध्ये टी ट्वेण्टी विश्वचषकही जिंकला.
10 हजार धांवापासून 23 धावा दूर
युनीस खानने 115 कसोटी सामन्यात 9977 धावा ठोकल्या आहेत. दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला अवघ्या 23 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तो हा टप्पा गाठेल अशी अपेक्षा चाहत्यांची आहे.
युनीस खानने कसोटीमध्ये 34 शतकं तर 32 अर्धशतकं ठोकली आहेत.
अनोखा विक्रम
सर्व कसोटी खेळणाऱ्या 11 देशांविरोधात शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत युनीस खान पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने हा विक्रम आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत युनीस खानने 34 वं शतक झळकावलं आणि तो सुनील गावस्कर, महेला जयवर्धने, आणि ब्रायन लारा यांच्यासह सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर पोहोचला.
युनीस खानने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 313 धावा केल्या होत्या. ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
मिसबाह उल हकचाही अलविदा
पाकिस्तानचं कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ नेतृत्त्व करणारा कर्णधार मिसबाह उल हकनं अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.
या दौऱ्यानंतर आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा मिसबाह उल हकनं केली.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्त्व करण्याची संधी आपल्याला मिळाली नाही, याबद्दल त्यानं खंत व्यक्त केली. 2011 किंवा 2015 साली आपण पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देऊन शकलो नाही, ही आपली अपूर्ण राहिलेली महत्त्वाकांक्षा असल्याचं त्यानं सांगितलं.
कारकीर्दीत नवं काही मिळवायचं राहिलं नाही म्हणून, आपण 2012 साली ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधून, 2015 साली वन डे क्रिकेटमधून निवृत्त झालो. त्याच कारणासाठी आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याचं मिसबाह उल हकनं सांगितलं.