किदम्बी श्रीकांतचा दणदणीत विजय, फ्रेन्च ओपनचं विजेतेपद भारताला
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2017 08:46 PM (IST)
श्रीकांतने पुरुष एकेरीच्या फायनलवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
प्रातिनिधिक फोटो
पॅरिस : भारताच्या किदंबी श्रीकांतने जपानच्या केन्टा निशिमोटोचा 21-14, 21-13 असा धुव्वा उडवून, फ्रेन्च ओपन सुपर सीरीज बॅडमिंटनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आठव्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या फायनलवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्याने केन्टा निशिमोटोला अवघ्या 35 मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला. श्रीकांतचं हे बॅडमिंटनच्या प्रीमियर सुपर सीरीजमधलं हे चौथं विजेतेपद ठरलं. त्याने याच वर्षी इंडोनेशियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि डेन्मार्क ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. आता त्याच्या खजिन्यात फ्रेन्च ओपनच्या विजेतेपदाचीही भर पडली आहे. पुरुष एकेरीत एकाच मोसमात सुपर सीरीजची चार विजेतीपदं पटकावणारा तो जगातला चौथा खेळाडू ठरला.