Khelo India Youth games : मध्य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच वेदांत याने मिळविलेल्या सुवर्णपदकाने झाली. मुंबईच्या या खेळाडूने 200 मीटर फ्रीस्टाईलचे अंतर एक मिनिट 55.39 सेकंदात पार केले.‌ गतवर्षी डॅनिश खुल्या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवणाऱ्या या खेळाडूने येथे सुरुवातीपासूनच फ्रीस्टाईलचे अप्रतिम कौशल्य दाखवत ही शर्यत सहज जिंकली. वेदांत हा ख्यातनाम सिने कलाकार आर. माधवन यांचा मुलगा असून त्याने जलतरणातच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला सुरुवातीपासून त्याच्या पालकांकडून सातत्याने सहकार्य मिळाले आहे. 


जागतिक कनिष्ठ गट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मुंबईची अपेक्षा फर्नांडिस हिने शंभर मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट 13.78  सेकंदात जिंकली. तिने सुरुवातीपासून या शर्यतीत आघाडी घेतली होती. अपेक्षा ने आजपर्यंत कारकिर्दीत  राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. 


पुण्याचा खेळाडू शुभंकर या खेळाडूने चिवट आव्हानास सामोरे जात पन्नास मीटर्स बटरफ्लाय शर्यत 25.44 सेकंदात पार केली. त्याच्यापुढे जनजॉय ज्योती हजारिका (आसाम) व श्याम सौंदर्यराजन (तमिळनाडू) यांचे आव्हान होते. तरी त्याने सुरुवातीपासूनच आश्वासक कौशल्य दाखवताना आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत आघाडी राखत ही शर्यत जिंकली. त्यांनी याआधी कोमानांच्या राष्ट्रीय स्पर्धेतही सोनेरी वेध घेतला होता. शुभंकर हा पुण्यात भूपेंद्र  आचरेकरदु तसेच दुबई येथे प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.‌ मुलांच्या शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत अर्जुन याला कास्यपदक मिळाले. मुंबईच्या या खेळाडूने ही शर्यत एक मिनिट 7.29 सेकंदात पूर्ण केली.


स्लॅलममध्ये अपयशी सुरुवात


महाराष्ट्राला साहसी क्रीडा प्रकारातील स्लॅलम (कॅनॉइंग-कयाकिंग) मध्ये अपयश आले. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र प्रथमच सहभागी झाले होते. महाराष्ट्राची मनस्वी राईकवार ही 724.976 सेकंद अशी वेळ देत सहाव्या स्थानावर राहिली. यजमान मध्य प्रदेशाच्या मानसी बाथमने सुवर्ण, तर हरियानाच्या प्रिती पालने रौप्य आणि कर्नाटकाच्या धरिती मारियाने ब्रॉंझपदक मिळविले. 


कबड्डीत पुन्हा संमिश्र यश


कबड्डीत दुसऱ्या दिवशीदेखील संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी हरयाणाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागलेल्या मुलींनी तेलंगणाचा 64-16 असा 48 गुणांनी पराभव केला. हरजित, मनिषा, ऋतुजा यांच्या तुफानी खेळाने मंध्यतरालाच 31 गुणांची आघाडी घेत महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. उत्तरार्धात खेळाचा वेग काहीसा संथ केला. उत्तरार्धात आणखी 17 गुणांची कमाई करताना महाराष्ट्राने मोठा विजय मिळविला.  मुलांच्या संघाला बिहारविरुद्धच्या विजयी खेळातील सातत्य राखता आले नाही. मुलांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, राजस्थानविरुद्ध हे प्रयत्न 27-28 असे एका गुणाने कमी पडले.