Chinchwad By Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Vidhan byelection) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या (NCP) नाना काटे (Nana Kate) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या मतदार संघात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी यादी होती. त्यात राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादीने काटे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. 


चिंचवडमध्ये नाना काटे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मोठ्याने घोषणाबाजी देखील केली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी घोषणा केली. त्यानंतर दुपारी अर्ज दाखल करण्याआधी नाना काटे यांची पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. पदयात्रेनंतर दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नाना काटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. 


राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर काल रात्री उशीरापर्यंत अजित पवार यांनी बैठक घेतली आणि आज सकाळी नाना काटे यांचं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित केलं.


कोण आहेत नाना काटे?


नाना काटे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहे. 2007 पासून सलग तीन वेळा पिंपरी पालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यासोबतच ते पालिकेत विरोधी पक्ष नेते देखील  होते. 2014 ला चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप आणि राहुल कलाटे यांच्या विरोधात लढले होते. त्यामुळे त्यावेळी तिहेरी लढत झाली होती. या लढतीत भाजपचे लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. राहुल कलाटे आणि नाना काटे हे पराभूत झाले होते. त्यात राहुल कलाटे यांच्यापेक्षा नाना काटे यांना कमी मतं मिळाली होती. त्यामुळे मतांच्या बाबतीत ते 2014 ला तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांची पत्नी देखील राजकारणात सक्रिय आहे. त्यात नगरसेविका होत्या. 


राहुल कलाटेंचं नाव चर्चेत असताना नाना काटेंना उमेदवारी का?


चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांची नावं चर्चेत होती. या दोघांपैकी राहुल कलाटेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र ऐन वेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली तर प्रचार करणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. शिवाय महाविकास आघाडीने उमेदवार आयात करु नये असंदेखील त्यांचं मत होतं. आमदार सुनील शेळके यांनी देखील उमेदवार आयात करणार नसल्याचं दबक्या आवाजात बोलून दाखवलं होतं. शिवाय उमेदवार घड्याळाचाच असणार असंही ते म्हणाले होते. त्यानुसार नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


भाजपकडून आश्विनी जगताप यांना उमेदवारी 


भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.