मुंबई : 'कॉफी विथ करण'मधील महिलांवरील आक्षेपार्ह टिप्पणी टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज हार्दिक पंड्याला अतिशय महागात पडली आहे. बीसीसीआयच्या कारवाईनंतर आता मुंबईतील खार जिमखानाने हार्दिक पंड्याचं मानद सदस्यत्व काढून घेतलं आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये खार जिमखान्याने त्याला मानद सदस्यत्व बहाल केलं होतं.
"राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना आम्ही मानद सदस्यत्व देतो, तशीच आम्ही त्यालाही दिलं," असं खार जिमखान्याचे सहसचिव गौरव कपाडिया यांनी सांगितलं. "फेसबुक अकाऊंटवर आमचे 4000 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. हार्दिकच्या टिप्पणीनंतर मोठा वाद सुरु झाल्यानंतर बरेचसे सदस्य, विशेषत: महिलांनी मागणी केली की क्लबने यावर काहीतरी पावलं उचलायला हवीत. त्यामुळे सोमवारी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत हार्दिक पंड्याचं मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे," असंही कपाडिया म्हणाले.
हार्दिकसोबतचा करार रद्द
याशिवाय 'जिलेट' या कंपनीने हार्दिकसोबतचा करारही संपवला आहे. यामुळे हार्दिक पंड्याला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागणार आहे. मागील दोन वर्षांपासून मोठमोठ्या कंपन्या हार्दिक पंड्याकडे एक ब्रॅण्ड म्हणून पाहत होत्या. हळूहळू त्याच्याकडे मोठ्या जाहिराती येत होत्या. परंतु सध्याच्या वादानंतर जाहिरात विश्वातही त्याच्या नावाची उलटी गणना होऊ लागली आहे.
काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने वादग्रस्त टिप्पणी केली होती. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं होतं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"
पंड्या-राहुलवर बंदी
महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वादात अडकलेल्या टीम इंडियाच्या अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयकडून चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल आगामी वन-डे मालिकेला मुकणार आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर आगामी वनडे मालिकेत बंदी घालावी, अशी शिफारस केली होती. त्यानुसार या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियावरुन परतले आहेत.
संबंधित बातम्या
करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित
हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस
'कॉफी विद करण'मुळे वाद, हार्दिक पंड्याकडून माफी
हार्दिक पंड्याचं मानद सदस्यत्व खार जिमखान्याकडून रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2019 08:33 AM (IST)
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने वादग्रस्त टिप्पणी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -