नवी दिल्ली : टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशामुळे आता प्रेक्षकांना 100 पेड चॅनल्स प्रतिमहिना 153 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत.

ट्रायने ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितले होते. त्यामुळे ही नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याबाबत माहितीदेखील दिली जात आहे.

ट्रायने जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. ट्रायच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एका एचडी चॅनेलची किंमत दोन एसडी चॅनेल्सइतकी आहे.

जर ग्राहकांना 100 हून जास्त चॅनेल्स हवे असतील तर, 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये अधिक द्यावे लागतील. ट्रायचे नवे नियम 29 डिसेंबर 2018 पासून लागू होणार होते परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले असून 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे. ट्रायच्या या नव्या नियमांमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत नाही, असा दावा ट्रायने केला आहे.

कुठे मिळेल माहिती?
ट्रायने 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) हे दोन टेलिफोन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर कॉल करुन तसेच advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gove.in या दोन ईमेल आयडीवर मेल करून ग्राहकांना अधिक माहिती मिळवता येईल.