पिंपरी चिंचवड : लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टायगर पॉईंटवर घडलेल्या प्रकारात गुजरातमधील कुटुंबातले पाच जण जखमी झाले आहेत. टायगर पॉईंटवर काल संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.


गुजरातहून मेमन कुटुंबीय लोणावळ्याला पर्यटनासाठी आले होते. टायगर पॉईंटवर लहानग्यांच्या हट्टापायी उंट आणि घोडेस्वारी करण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र उंटाच्या मालकासोबत पैशाच्या देवाणघेवाणीवरुन मेमन कुटुंबीयांचा वाद सुरु झाला.

जास्तीचे पैसे मागितल्यामुळे पर्यटकांसमोर भांडाफोड होईल, या भीतीने एकाने मेमन यांचा भाचा आसिफ मोतीवालाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर व्यापारी आणि मेमन कुटुंबीयांमध्ये खडाजंगी झाली.

व्यापारी आणि स्थानिकांनी काठी, पाईप आणि काचेच्या बाटल्यांनी मेमन कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यात स्थानिक महिलाही सामील झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मारहाणीत मेमन कुटुंबियांनी आपल्या 92 हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. या घटनेत आसिफ मोतीवालासह अहमद मेमन, सुफीयान मेमन, रईसा मेमन आणि नसर मेमन हे जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.