मुंबई : क्रिकेटमध्ये मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतल्यानंतर, त्याला आता चक्क टेनिसमधून आव्हान मिळालं आहे. हे आव्हान दुसरं तिसरं कोणी नाही तर विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडररला पराभूत करणाऱ्या केविन अँडरसनने दिलं आहे.
डिव्हिलियर्स क्रिकेटसह अनेक खेळांमध्ये पारंगत आहे. टेनिसचीही त्याला विशेष आवड आहे. 1996 मध्ये शालेय स्तरावरील टेनिस सामन्यात डिव्हिलियर्सने केविन अँडरसनचा पराभव केला होता. त्यावेळी डिव्हिलियर्स 12 तर अँडरसन 10 वर्षांचा होता. एबी डिव्हिलियर्स आणि केविन अँडरसन दोघेही दक्षिण आफ्रिकेचेच आहेत.
शाळेत असताना डिव्हिलियर्सकडून झालेला पराभव अँडरसन अजून विसरलेला नाही. एका मुलाखतीदरम्यान, तो सामना आठवताना अँडरसन म्हणाला की, "डिव्हिलियर्सने केलेल्या पराभवाचा मला बदला घ्यायचा आहे." अँडरसनने डिव्हिलियर्सला एक री-मॅचसाठी आव्हान दिलं आहे, जेणेकरुन तो 22 वर्ष जुन्या पराभवाचा बदल घेऊ शकेल.
डिव्हिलियर्सने आयपीएलच्या अकराव्या मोसमानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केली. मात्र निवृत्तीनंतरही डिव्हिलियर्स आपला स्थानिक संघ टायटन्ससाठी खेळत राहणार आहे. तसंच डिव्हिलियर्सने टी-20 लीगमध्येही खेळण्याचे संकेत दिले आहेत.
तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या केविन अँडरसनने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्वी फेरीत रॉजर फेडररवर 2-6,6-7,7-5,6-4,13-11 अशी मात केली होती. त्याआधी फेडररने अँडरसनचा चार वेळा पराभव केला होता.