नागपूर : स्कूल बसखाली चिरडून नर्सरीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातील उमरेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूरमध्ये उमरेड तालुक्यातील अकोला भागात 'वृंदावन कॉन्व्हेंट आणि ज्युनियर कॉलेज आपतुर' शाळा आहे. शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या शिवम अमोल राघोर्ते या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.
शुक्रवारी संध्याकाळी शिवम स्कूल बसने घरी येत होता. स्टॉपवर शिवम उतरला आहे की नाही, हे न पाहताच बस चालकाने घाईने बस पुढे नेली. त्यामुळे शिवमचा तोल गेला आणि तो खाली पडला. दुर्दैवाने बसच्याच मागच्या चाकाखाली तो चिरडला गेला.
घटनेनंतर संतप्त झालेल्या गावातील नागरिकांनी स्कूल बस फोडली.
गेल्या 24 तासात नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी, रामटेक तालुक्यात जुनेवानी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
तिसरीत शिकणाऱ्या अमन धुर्वेचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला. विजेच्या अर्थिंगसाठी खोदलेल्या खड्ड्यात फुटबॉल गेल्यामुळे अमन तो काढण्यासाठी खड्ड्यात उतरला. तेव्हा विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.