तिरुवअनंतपुरम : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी केरळ हायकोर्टाने कायम ठेवली आहे. बीसीसीआयने केलेल्या याचिकेवर केरळ हायकोर्टाने हा निर्णय दिला.


श्रीसंतवर आजीवन बंदी त्याच्याविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर घालण्यात आली आहे. त्यामुळे कोर्ट बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीच्या निर्णयाची न्यायिक समीक्षा करु शकत नाही, असं म्हणत श्रीसंतवरील बंदी कोर्टाने कायम ठेवली.

श्रीसंतकडे आता काय पर्याय?

कोर्टाच्या या निर्णयामुळे, श्रीसंतला रणजी ट्रॉफीतील आगामी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. शिवाय बीसीसीआय आणि राज्य संघांच्या कोणत्याही सराव सत्रात त्याला सहभाग घेता येणार नाही. श्रीसंतकडे आता केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय उरला असून तो सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे.

काय आहे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण?

2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणी त्याला दिल्लीतील तिहार जेलमध्येही ठेवण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 मे रोजी श्रीसंत, अजित चांडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली होती.

यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या समितीने श्रीसंत दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 13 सप्टेंबर 2013 रोजी श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोर्टाचा निर्णय अत्यंत वाईट : श्रीसंत

कोर्टाचा निर्णय हा आतापर्यंतचा सर्वात वाईट निर्णय असल्याचं श्रीसंतने म्हटलं आहे. इतरांना वेगळा आणि आपल्याला वेगळा न्याय का, असा सवालही श्रीसंतने केला आहे.