मोहाली : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू शिलेदार केदार जाधवला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकावं लागण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात पंबाबविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे केदारची आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.


रविवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सामना खेळवण्यात आला. दोन्ही संघांचा हा साखळीमधील अखेरचा सामना होता. या सामन्यात पंजाबची फलंदाजी सुरु असताना 14 व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जाडेजाने केलेला ओव्हरथ्रो अडवण्याच्या प्रयत्नात केदार जायबंदी झाला.

दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबने या सामन्यात चेन्नईनं दिलेलं 171 धावांचं आव्हान पार करत चेन्नईला धूळ चारली. लोकेश राहुलच्या दमदार अर्धशतकामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून यंदाच्या मोसमाची विजयी सांगता केली. या सामन्यात चेन्नईने दिलेलं 171 धावांचं आव्हान पंजाबने बारा चेंडू आणि सहा विकेट्स राखून पार केले. ख्रिस गेल आणि राहुलने सलामीच्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचून पंजाबच्या विजयाचा पाया रचला. राहुलनं 36 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांसह 71 धावा फटकावल्या. तर गेलने 28 धावांची खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरननं पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबनं यंदाच्या मोसमात चौदापैकी सहा सामन्यात विजय मिळवला.

दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्सवर सहा विकेट्सनी मात करत आयपीएल 2019 चा आपला शेवट गोड केला. लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीने किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, शेवटी हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पंजाबने चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य 18 व्या षटकातच सहज पार केले. राहुल ( 71) आणि ख्रिस गेलशिवाय निकोलस पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवानंतरही चेन्नईचं अव्वल स्थान कायम आहे. मात्र हा स्थान मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून आहे. असे असले तरी त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमधल्या अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या फाफ ड्यू प्लेसीचे शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. त्यानं 55 चेंडूत 10 चौकार आणि चार षटकारांसह 96 धावांची खेळी केली. तर डावखुऱ्या सुरेश रैनानं 38 चेंडूत 53 धावा फटकावून त्याला छान साथ दिली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईला 20 षटकांत पाच बाद 170 धावांची मजल मारता आली. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.