IPL 2019 : मुंबईकडून पराभव झाल्यानं कोलकात्याचं प्ले ऑफचं स्वप्न धुळीला, हैदराबाद प्ले ऑफमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2019 12:00 AM (IST)
या पराभवामुळे कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर हैदराबादला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाले आहे. प्ले ऑफमध्ये आता मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या कोलकात्याचं प्ले ऑफमध्ये धडक मारण्याचं स्वप्न अखेरीस धुळीला मिळालं. कर्णधार रोहित शर्माचं नाबाद अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या जबाबदार खेळीमुळे मुंबईनं कोलकात्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रोहित शर्मानं आठ चौकारांसह नाबाद 55 तर सूर्यकुमारनं नाबाद 46 धावांची खेळी केली. या विजयासह मुंबईनं गुणतालिकेत अठरा गुणांसह अव्वल स्थानंही गाठलं. त्याआधी मुंबईच्या प्रभावी माऱ्यामुळे कोलकात्याला 20 षटकांत सात बाद 133 धावाच करता आल्या. शुभमन गिल (9) आणि ख्रिस लिन (41 ) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने 40 धावांची खेळी केली. मुंबईच्या लसिथ मलिंगानं तीन तर जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या पराभवामुळे कोलकात्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर हैदराबादला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाले आहे. प्ले ऑफमध्ये आता मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.