टीम इंडियाचा 'वाघ' केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2017 10:14 PM (IST)
कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. कोलकाता वन डेमध्ये इंग्लंडने 5 धावांनी भारतावर विजय मिळवला, मात्र टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. कोलकात्याच्या वन डे सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 322 धावांचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला. एकाकी झुंज देत केदारने 75 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि एक षटकार ठोकत 90 धावांची खेळी केली. तुफान फलंदाजी करणारा केदार जाधव अवघा एक चेंडू बाकी असताना बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. इंग्लंडनं 50 षटकांत 8 बाद 321 धावा करुन भारताला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची गरज होती, मात्र भुवनेश्वर विजयाचा शिल्पकार ठरु शकला नाही. कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतक ठोकलं, तर युवराज सिंगनंही 45 धावांची खेळी केली. भारताचा निम्मा संघ 173 धावांत माघारी परतला. आर अश्विनही अवघी एक धाव करुन तंबूत परतला. त्यामुळे भारतीय फलंदाज विजयासाठी काहीसा संघर्ष करावा लागला.