गेल्या काही दिवसांपासून 'सामना'तून शिवसेनेकडून येणारे टीकेचे बाण किंवा भाजपला 60 जागा देण्याचा सेनेने घेतलेला निर्णय, यामुळे भाजपच्या गोटात तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे. युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबाबत चर्चा करायची की नाही, याबाबतही दानवे आणि फडणवीस अंतिम निर्णय घेतील.
बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, योगेश सागर, विद्या ठाकूर यासारखे भाजप आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत 227 जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे भाजपचा जाहीरनामा, उमेदवार, पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. रात्री 9 वाजता राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक होत आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली. पण या बैठकीत भाजपकडून देण्यात आलेला 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला. शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रस्ताव नाकारल्यानं युती तुटण्याची चिन्हं निर्माण झाली.
नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी दुपारी भाजपला लगावला होता. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम आहे.