बीड : केज येथील कविता दिलीप पाटीलची भारतीय महिला क्रिकेट अ संघात निवड झाली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ती भारताकडून खेळणार आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या ‘अ’ महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची ‘अ’ टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबर पासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार असून 3 टी-20 सामने 12 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणार आहेत.
कोण आहे कविता पाटील?
कविताचं महाविद्यालयीन शिक्षण प्रवरानगर येथे झालं असून पुण्याच्या बीएमसीसी कॉमर्स कॉलेजमधून ती पदवीधर झाली. त्यानंतर तिची निवड भारतीय रेल्वेमध्ये झाली. ती सध्या कार्यालयीन अधीक्षक पदावर आहे. शालेय जीवनात बास्केटबॉलची आवड असणाऱ्या कविताला नंतर क्रिकेटची आवड लागली.
खडतर मेहनतीने क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवत तिने 17 आणि 19 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर ती पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडूनही खेळली.
2009 साली तिने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एंट्री करत सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. कामगिरीतील चढत्या आलेखामुळे कविताला प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.