मुंबई : क्रिकेटच्या दुनियेतल्या पारंपरिक युद्धासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा ब्रिस्बेनच्या 'गाबा'वर सज्ज झाल्या आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या या पारंपरिक कसोटी युद्धाला म्हणजे अॅशेस मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेतली पहिली कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येईल.


इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या अॅशेस मालिकेला मोठा इतिहास आहे. या मालिकेची सुरुवात 19 व्या शतकात झाली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या पहिल्या अॅशेस मालिकेचं आयोजन 1882-83 च्या मोसमात करण्यात आलं होतं. आज 134 वर्षे उलटली आहेत, पण पहिल्या अॅशेस मालिकेची तीव्रता आजही कायम असल्याची ग्वाही डेव्हिड वॉर्नरने पहिली ठिणगी टाकून दिली.

इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका म्हणजे एक युद्धच असतं, अशी प्रतिक्रिया देऊन वॉर्नरने आपल्या सहकाऱ्यांना चेतवलं आहे. वॉर्नरच्या त्याच प्रतिक्रियेतून दीक्षा घेऊन बहुतेक ऑस्ट्रेलियन शिलेदार आता इंग्लंडला वेगाचा दणका देण्याची भाषा करू लागले आहेत.

अॅशेस मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन फौजेचा चेहरामोहरा हा नवा असला, तरी या फौजेच्या रणनीतीला वेगवान आक्रमणाची जुनीच धार आहे. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स ही ऑस्ट्रेलियाची वेगवान त्रयी इंग्लिश फलंदाजांवर आग ओकण्याच्या इराद्यानंच गाबाच्या रणांगणात उतरण्याची चिन्हं आहेत.

2013 सालच्या ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनच्या जहाल माऱ्यात इंग्लिश फलंदाज अक्षरश: होरपळून निघाले होते. जॉन्सनने त्या कसोटीत इंग्लंडच्या नऊ फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला 381 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता.

ब्रिस्बेनच्या त्याच विजयाने ऑस्ट्रेलियाच्या 5-0 अशा 'क्लीन स्विप'चा भक्कम पायाही घातला. चार वर्षांनी पुन्हा त्याच ब्रिस्बेनच्या 'गाबा'वर नव्या अॅशेस मालिकेची सलामी देताना, स्टार्क, हेझलवूड आणि कमिन्स या वेगवान त्रिकूटाला मिचेल जॉन्सनचा आदर्श बाळगण्याचा कानमंत्र स्टीव्ह स्मिथला दिला असण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान त्रिकूटाचा सामना करणं इंग्लिश फलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. कारण अलीकडच्या काळात इंग्लंडच्या फलंदाजीची मोठी परीक्षा झालेली नाही. त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सवर नाईट क्लबबाहेरच्या मारामारीप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या कारवाईने इंग्लंडच्या अॅशेस राखण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे.

बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या फलंदाजीची मदार ही प्रामुख्याने कर्णधार ज्यो रूट आणि माजी कर्णधार अॅलेस्टर कूक या जोडीवर राहिल. हीच बाब लक्षात घेऊन मिचेल स्टार्कने त्या दोघांनाच आपलं मुख्य लक्ष्य बनवण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या अॅशेस युद्धात ज्यो रूट विरुद्ध मिचेल स्टार्क आणि अॅलेस्टर कूक विरुद्ध मिचेल स्टार्क ही द्वंद्व वैशिष्ट्यं ठरतील.

अर्थात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान अस्त्रांना इंग्लंडच्या भात्यातही वेगाचं उत्तर आहे. ऑस्ट्रेलियाच्या भात्यात स्टार्क, हेझलवूड आणि कमिन्स ही वेगवान अस्त्रं आहेत, तर इंग्लंडच्या भात्यात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स ही वेगवान अस्त्रं आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर हे दोघं इंग्लंडच्या वेगवान अस्त्राचं मुख्य लक्ष्य असतील. कारण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे ते दोघं मुख्य आधारस्तंभ आहेत. स्मिथ आणि वॉर्नरला जितक्या लवकर माघारी धाडता येईल, तितक्या लवकर इंग्लंडला आगामी मालिकेत खेळावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

स्पोर्टस डेस्क, एबीपी माझा