नागपूर : भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने रणजी सोडून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. जो बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांना पसंत आलेला नाही.


युवराजने आतापर्यंत पंजाबच्या रणजी संघाकडून पाचपैकी केवळ एकच सामना खेळला आहे. विदर्भाविरुद्धच्या एकाच सामन्यात तो खेळला आहे, ज्यामध्ये त्याने एका डावात 20 आणि दुसऱ्या डावात 42 धावा केल्या होत्या.

युवराजने कोणतीही दुखापत झालेली नसताना एनसीएमध्ये हजेरी लावल्याने बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. युवराज यो यो फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी मेहनत घेत आहे, ज्यामध्ये यापूर्वी तो अपात्र ठरला होता.

भारतीय संघात पुनरागमन करणं युवराजसाठी गरजेचं आहे. कारण आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत पुनरागमन करण्याची त्याला अपेक्षा असेल. कारण भारतीय संघातून बाहेर असलेला खेळाडू घेणं ही आयपीएल संघांसाठी प्राथमिकता नसते.

''युवराज दुखापतग्रस्त असल्याचा कोणताही रिपोर्ट नाही. मात्र तो यो यो टेस्ट पास होण्यासाठी विशेष फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. मात्र रणजी सोडून एनसीएत राहणं चुकीचं आहे. यावर युवराजलाच निर्णय घ्यावा लागेल'', असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

''जर युवराजने 16.1 (भारतीय संघ व्यवस्थापनाकडून निश्चित करण्यात आलेला मानक) मिळवला आणि त्याच्या खात्यात धावाच नसतील, तर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलं जाणार आहे का?'' असा सवालही अधिकाऱ्याने केला.

''युवराजने पंजाब रणजी संघ व्यवस्थापनाला असं सांगितल्याचं ऐकलंय की, भारतीय संघाने त्याला फिटनेस टेस्ट करायला सांगितलं आहे. मात्र भारतीय संघाने नेहमीच रणजी खेळण्यावर भर दिला आहे. ईशांत शर्माला पाहा. तो देखील सध्या भारतीय संघात आहे, मात्र त्याला कोलकाता कसोटीच्या एक दिवस अगोदरच सोडण्यात आलं, जेणेकरुन तो महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात खेळू शकेल'', असंही अधिकारी म्हणाले.