मुंबई : द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. खलीसारखाच कोणी पुरुष मल्ल असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर थांबा. WWE च्या रिंगमध्ये उतरणारा भारताचा आगामी मल्ल हा पुरुष नाही तर महिला आहे.


कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवी अन्य महिला रेसलर्सप्रमाणे, WWE च्या कॉश्च्युममध्ये मैदानात उतरत नाही, तर पारंपारिक पंजाबी ड्रेसवर रिंगमध्ये उतरते.

ओढणी कमरेला बांधून प्रतिस्पर्धी महिलेला भारतीय ठोसे लगावून विजय मिळवणं, ही कविता देवीची खासियत आहे.

कविता देवी ही पहिली भारतीय महिला आहे, जी WWE मध्ये सहभागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवीचा प्रशिक्षक दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द ग्रेट खली हाच आहे.

सलवार-कमीज परिधान करुन, रिंगमध्ये उतरुन प्रतिस्पर्ध्याला मात देणारी कविता देवी, सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.

कविता देवीचे रेसलिंग व्हिडीओ न्यूझीलंडची महिला रेसलर डकोटा कायने यूट्यूबवर नुकताच अपलोड केला आहे. हा व्हिडीओ या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओला अल्पवधीतच 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

महिलांच्या स्पर्धेत कविता देवीने छाप पाडली. या सामन्यात कविता देवीचा न्यूझीलंडच्या डकोटा कायकडून पराभव झाला. मात्र कविता देवीची फाईट पाहून इंटरनेट जगतात तिचंच नाव गाजत आहे.

माय यंग क्लासिक मॅचेसमध्ये 16 सामने झाले. यापैकी सर्वाधिक गाजलेला सामना हा कविता देवी आणि डकोटा काय यांचा होता. या सामन्याचा व्हिडीओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेला आहे.

कोण आहे कविता देवी?



• WWE मध्ये प्रतिनिधित्त्व करणारी पहिली भारतीय महिला

• कविता देवी हरियाणातील मालवी या खेड्यातील राहणारी आहे.

• कविता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्ट क्रीडाप्रकारात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.

• कविता देवीने 2016 मध्ये 75 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.

• क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे हरियाणा सरकारने तिला पोलिस दलात नोकरी दिली.

• पोलीस दलात ती कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मात्र 2010 मध्ये ती पोलीस उपनिरीक्षकपदावर निवृत्त झाली.

• खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने नोकरीला रामराम ठोकला.

• कविता देवीला भारतीय रेसलर ग्रेट खलीने प्रशिक्षण दिलं आहे.

पाहा व्हिडीओ