चेन्नई: टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत नायरने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज नाबाद त्रिशतक झळकावलं आहे. नायरच्या दणदणीत त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 759 धावांपर्यंत मजल मारून, डाव घोषित केला.


चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवसाचा संपला, त्यावेळी इंग्लंडने बिनबाद 12 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे अजूनही 270 धावांची भक्कम आघाडी आहे. किटन जेनिंग्स नाबाद 9 तर कर्णधार अॅलिस्टर कूक नाबाद 3 धावांवर खेळत आहेत.

दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ गाजवला तो टीम इंडियाच्या करुण नायरने. नायरने 381 चेंडूत 32 चौकार आणि 4 षटकार ठोकून त्रिशतकाला गवसणी घातली.


करुण नायर हा आपल्या पहिल्याच कसोटी शतकाचं त्रिशतकाच रुपांतर करणारा आजवरचा तिसराच खेळाडू ठरला. याआधी गॅरी सोबर्स आणि बॉबी सिम्पसन यांनी असा पराक्रम गाजवला होता.

तसंच करुण नायर हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी वीरेंद्र सहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर आता करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक साजरं केलंय.

नायरने त्याचं 185 चेंडूत शतक,  306 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं.

दरम्यान भारताने कसोटी इतिहासात सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. भारताने स्वत:च्या 726 धावांचा विक्रम मोडला आहे.

सेहवागकडून कौतुक

दरम्यान, भारताचा पहिला त्रिशतकवीर वीरेंद्र सेहवागनेही करुण नायरचं कौतुक केलं.

"वेलकम टू द 300 क्लब, मागील 12 वर्ष 8 महिन्यांपासून एकटाच होतो. शुभेच्छा, मजा आली", करुणच्या त्रिशतकावर सेहवागचं ट्वीट



***********************************************************

टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत नायरने इंग्लंडविरुद्ध द्विशतक ठोकलं आहे. करुण नायरची ही तिसरीच कसोटी आहे. त्यामुळे करुणे कारकिर्दीला थेट द्विशतकाने सुरुवात केली असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

दुसरीकडे अष्टपैलू आर अश्विननेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे भारताने 600 धावांचा टप्पा ओलांडून, इंग्लंडवरील आघाडी सव्वाशे धावांवर नेली आहे.

नायरने 306 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. यामध्ये त्याने 22 चौकार आणि एक षटकार ठोकला.

***************************************************************

टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदापर्णाच्या कसोटी मालिकेत करुणने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज शतक ठोकलं आहे. कसोटीतील त्याचं हे पहिलंच शतक आहे. तर करुणचा हा तिसराच कसोटी सामना आहे.


चेन्नई कसोटीत करुण नायरने 185 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार ठोकत शतक झळकावलं. करुण नायरला मुरली विजयने उत्तम साथ दिली. त्यामुळे टीम इंडियाने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 430 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

त्यापूर्वी काल टीम इंडियाच्या सलामीवीर लोकेश राहुलचं द्विशतक एका धावेने हुकलं. तो 199 धावांवर बाद झाला.   पार्थिव पटेल आणि करुण नायर या सहनायकांनी राहुलला दिलेली साथही भारताच्या कामगिरीत मोलाची ठरली. राहुलचं पहिलंवहिलं द्विशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. त्यानं 311 चेंडूंमधली 199 धावांची खेळी 16 चौकार आणि तीन षटकारांनी सजवली.

संबंधित बातम्या
चेन्नई कसोटीत भारताचं इंग्लंडला जशास तसं उत्तर

199 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतलेले 10 खेळाडू