आयसीसी कसोटी क्रमवारीत करुण नायर, राहुलची मोठी झेप
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2016 07:05 PM (IST)
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कसोटीतील सलामीवीर लोकेश राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर या युवा फलंदाजांना चेन्नई कसोटीतल्या कामगिरीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत मोठा लाभ मिळवून दिला आहे. चेन्नई कसोटीत लोकेश राहुलचं द्विशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. पण या कामगिरीने त्याला 29 स्थानांची झेप घेण्यास मदत केली असून, राहुल आता 51 व्या स्थानावर विराजमान झाला आहे. चेन्नई कसोटीत नाबाद त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरला तर त्याच्या कामगिरीने तब्बल 122 स्थानांची झेप घेण्यास मदत केली आहे. कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत करुण नायर 55 व्या स्थानावर दाखल झाला आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत नायरने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज नाबाद त्रिशतक झळकावलं. संबंधित बातम्या :