नवी दिल्ली : माजी क्रिकेटर इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून 18 ऑगस्टला शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्याला टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव उपस्थित राहू शकणार नाहीत. वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


कपिल देव एबीपी न्यूजशी बोलत होते. शपथविधी सोहळ्याला न जाणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही. इम्रान खानने शपथविधीसाठी निमंत्रण दिलं आहे, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली.

कपिल देव यांच्यासोबतच टीम इंडियाचे माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू आणि सुनील गावसकर यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार असल्याचं नवजोत सिंह सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे.

आपण एक खेळाडू असल्यामुळे या शपथविधी सोहळ्याला जाणार असल्याचं सिद्धू यांनी सांगितलं आहे. राजकीय नेता म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून या सोहळ्याला जाणार आहे, असं ते म्हणाले. तर सुनील गावसकर यांनी यावर अजून काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक ए इंसाफ हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीतील यशाबद्दल कपिल देव यांनी इम्रान खान यांना शुभेच्छाही दिल्या. सोबतच पाकिस्तानने असं धोरण बनवावं, ज्यामुळे उभय देशांमधील संबंध सुधारतील आणि त्यामध्ये क्रिकेट खेळलं गेलं तर आणखी चांगलं आहे, असं कपिल देव म्हणाले होते.