कानपूर : कानपूर कसोटीचा दुसरा दिवस हा केन विल्यमसनच्या न्यूझीलंडचा आणि पावसाचा ठरला. या कसोटीत भारताच्या 318 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एक बाद 152 धावांची मजल मारली. पण त्यानंतर आलेल्या पावसामुळं 34 षटकांचा खेळ वाहून गेला.

या कसोटीत भारताच्या हाताशी अजूनही 166 धावांची आघाडी शिल्लक असली, तरी पहिल्या दोन दिवसांत झालेल्या खेळावर न्यूझीलंडनेच वर्चस्व राखल्याचं चित्र आहे.

आज सकाळी रवींद्र जाडेजाच्या नाबाद 42 धावांच्या झुंजार खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 318 धावांची मजल मारता आली.

त्यानंतर सलामीचा टॉम लॅथम आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं. उमेश यादवने मार्टिन गप्टिलला 21 धावांवर पायचीत करुन न्यूझीलंडला पहिला धक्का दिला होता. पण लॅथम आणि विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडला भक्कम स्थितीत नेलं.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विल्यमसन 65 धावांवर तर लॅथम 56 धावांवर खेळत होता.