नवी दिल्ली : हरियाणातील अल्पवयीन टेनिसपटू रुचिका गिऱ्होत्राच्या छेडछाड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हरियाणाचे माजी डीजीपी एसपीएस राठोड यांची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र राठोड यांनी यापूर्वीच तुरुंगवास भोगल्यामुळे दीड वर्षांची शिक्षा कमी करण्यात आली आहे.
एसपीएस राठोड यांना जेलमध्ये जावं लागणार नाही. 1990 मध्ये तत्कालीन आयजी असलेले एसपीएस राठोड हरियाणा टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते. 14 वर्षीय टेनिसपटू रुचिका गिऱ्होत्राची छेड काढल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
रुचिकाने त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर तिचीच शाळेतून हकालपट्टी करण्यात आली. त्याचप्रमाणे हरियाणा पोलिसांनी रुचिकाच्या कुटुंबीयांना त्रास दिल्याचंही म्हटलं जातं. 29 डिसेंबर 1993 रोजी रुचिकाने विष पिऊन आत्महत्या केली.
22 डिसेंबर 2009 रोजी, म्हणजे छेडछाडीच्या घटनेच्या तब्बल 19 वर्षांनंतर चंदिगड कोर्टाने राठोड यांना कलम 354 (छेडछाड) अन्वये दोषी ठरवलं. राठोड यांना सहा महिन्यांची कैद आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. हायकोर्टाने ही शिक्षा वाढवून 18 महिन्यांची केली होती.