मेलबर्न : कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅट्समधल्या ऑस्ट्रेलिया संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कसोटीवीर जस्टिन लँगरची नियुक्ती करण्यात आली आहे.


जस्टिन लँगरनं १०५ कसोटी आणि आठ वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ४७ वर्षांचा लँगर येत्या २२ मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारेल. त्याची जबाबदारी चार वर्षांसाठी असेल. या कालावधीत ऑस्ट्रेलियासमोर दोन अॅशेस मालिका, वन डे विश्वचषक आणि दोन ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांचं आव्हान असणार आहे.



केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर एका वर्षांची बंदी घातली आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाची नव्या जोमानं संघबांधणी करण्याचंही आव्हान लँगरवर राहिल.

बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेरेन लेहमनला क्लीन चिट देण्यात आली होती. पण त्यानंतरही लेहमननं प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. ऑस्ट्रेलिया संघासोबत लेहमनचा करार 2019 विश्वचषकापर्यंत होता. पण त्याच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलियाचं प्रशिक्षकपद रिक्तच होतं. त्यामुळे आता त्या जागी जस्टीन लँगरची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशिक्षकाच्या नियुक्तीनंतर ऑस्ट्रेलियाचे चाहत्यांना आता संघाच्या कर्णधाराबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.