रायगड: शेकडोंच्या संख्येनं मगरी वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.  हा व्हिडीओ खरोखरच सावित्री नदीच्या पात्रातला आहे का? याची खात्री करण्यासाठी आम्ही थेट महाडच्या सावित्रीच्या पात्रात पोहोचलो..


व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करण्यात आलेला हा व्हीडिओ थेट हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे सावित्री नदीच्या पात्रावर शूटिंग करण्यासाठी हेलिकॉप्टर कधी आले होते हा प्रश्न निर्माण होतो. इतकंच नाही... तर कोकणातल्या काही प्राणी अभ्यासकांनाही या व्हिडीओबद्दल शंका वाटली..

या व्हायरल व्हिडीओतल्या नदीशेजारचा परिसर पाहिला, कोकणातल्या डोंगर रांगांमधून वाहणारी सावित्री, पण या व्हिडीओमध्ये मात्र क्षितिजापर्यंत सपाट भूमी दिसत आहे. त्यामुळे ही नदी कोकणातली नसावी असा अंदाज आहे.

इतकंच नाही.. तर नेहमी खळाळत वाहणाऱ्या सावित्री नदीमध्ये जलपर्णी ही क्वचितच आढळते. त्यामुळे इतके गलिच्छ पाणी सावित्री नदीचे असू शकत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे

पण मग हा व्हीडिओ आहे तरी कुठला... हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला... त्यासाठी यूट्यूबवर सर्च करून पाहिले... तेव्हा लक्षात आलं... हा व्हिडीओ वेगवेगळ्या नद्यांच्या नावाने यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला आहे.

त्यामुळे मंडळी आला मेसेज की कर फॉरवर्ड हे धोरण सोडा.. आधी थोडी शहानिशा करा... महाडकरांनो... या मगरी तुमच्या सावित्री नदीतल्या नाहीत... निश्चिंत राहा...

VIDEO: