मुंबई : मुंबई इंडियन्सनं हैदराबादच्या रणांगणात आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयी क्षणाच्या काही तास आधी, त्यांचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सला आनंदाची बातमी मिळाली.


दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी आणि त्याची पत्नी मेलानी यांना रविवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुंबईतल्या सांताक्रुझच्या एका रुग्णालयात मेलानी हिनं मुलाला जन्म दिला. जॉन्टीनं आपण पुन्हा बाबा झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली.

जॉन्टीने आपल्या लेकाचं नाव नाथन असं ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यापूर्वी जॉन्टीने केलेल्या ट्वीटमध्ये 'बक्षिसापूर्वीचं बक्षिस' असं म्हटलं होतं.

https://twitter.com/JontyRhodes8/status/866278510142386176

बाळाचं वजन 3.7 किलो असून बाळ-बाळंतीण सुखरुप आहेत. सुर्या हॉस्पिटलमध्ये डॉ. अमित धुरंधर यांनी वॉटर डिलीव्हरी केली.

ऱ्होड्स दाम्पत्याचं हे दुसरं अपत्य आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या थोरल्या लेकीचा जन्मही सांताक्रुझच्या याच रुग्णालयात झाला होता. जॉन्टीनं तिचं नाव इंडिया ठेवून, आपला भारताविषयीचा आदर व्यक्त केला होता.

काहीच दिवसांपूर्वी इंडियाचा दुसरा वाढदिवस झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या.