जो रूट इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार!
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 09:47 PM (IST)
लंडन : इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून ज्यो रूटला बढती देण्यात आल्याची माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली आहे. मूळचा यॉर्कशायर कौंटीचा रूटने गेल्या काही वर्षांमध्ये जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ओळख मिळवली आहे. रुट कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं उपकर्णधारपद भूषवत होता. त्यामुळे अॅलेस्टर कूकने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्याच्याऐवजी रूटच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर बेन स्टोक्सची इंग्लंडच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पराभवानंतर कूक कर्णधारपदावरुन पायऊतार काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या अॅलेस्टर कूकने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कूकने 2012 साली इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती. त्याच्याच नेतृत्त्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली अॅशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. मात्र गेल्या वर्षी भारतातील कसोटी मालिकेत 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यावर कूकने कर्णधारपदाविषयी पुनर्विचार करत असल्याचं कबूल केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व करणं हा माझा बहुमान समजतो. पण संघाचं हीत पाहता आणि माझ्या कारकीर्दीच्या दृष्टीनेही मी या जबाबदारीतून मोकळं होणं योग्य ठरेल, असं कूकनं म्हटलं होतं. संबंधित बातम्या :