पुणे : राष्ट्रवादी ही कनफ्युज पार्टी आहे. येत्या काळात त्यांच्याकडे पुण्यासह पिंपरी चिंचवडही राहणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.


आपण सर्वांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिलेला आहे. काँग्रेसचं तर अस्तीत्वच दिसत नाही. आणि आमचा मित्रपक्ष (शिवसेना) तर पुण्यात शोधूनही सापडत नाहीये. मित्रपक्ष सत्तेसाठी कुठे काँग्रेससोबत तर कुठे राष्ट्रवादीसोबत सेटिंग करतोय, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केला.

''आम्ही विकास आराखडा मंजूर केला''

मागच्या निवडणुकीत मी आलो होतो, त्यावेळी विकास आराखडा हा निवडणुकीचा मुद्दा होता. त्याच्या आधीच्या निवडणुकीतही मी आलो होतो, त्यावेळीही विकास आराखडा हाच मुद्दा होता. यावेळी मात्र तो मुद्दा नाही कारण विकास आराखडा आम्ही आधीच मंजूर केला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

''पुण्याला तीन वर्षात देशाचं स्टार्टअप कॅपिटल करु''

येत्या तीन वर्षात पुण्याला देशाचे स्टार्ट अप कॅपिटल करु. पुणे शहर देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल. शिवाय पुण्यात सत्ता आल्यानंतर मेट्रो आणि बस यांचं इंटिग्रेशन केलं जाईल. पुणेकरांना एकाच तिकिटावर बस आणि मेट्रोचा प्रवास करता येईल, अशी व्यवस्था उभारु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात पुण्यासाठी PMRDA ची निर्मिती झाली नाही, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाय आघाडी सरकारने एसआरएच्या योजनेचा बट्ट्याबोळ केला, तो आम्ही बदलू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.