सांगली: ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल.’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.


सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन त्यांनी पक्षात घराणेशाही आणली असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे. मी सदाभाऊच्या मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही असं सांगायलाही राजू शेट्टी विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतने वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरला. त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर घराणेशाहीची टीका केली आहे.

'भाजपकडून मित्राचं घर फोडण्याचा प्रयत्न'

'नेमकं कधी पडणार हे सांगता येणार नाही, पण भाजपची सध्याची वाटचाल आणि मित्रपक्षाबरोबरचं वागणं बघता, कधीतरी या निर्णयापर्यंत जावं लागेल. स्वाभिमानीतील नाराज लोकांना भेटा त्यांना उमेदवारीचं आमिष दाखवा. असे प्रकार भाजपकडून सुरु आहेत. म्हणजे जणू काही मित्राचंच घर फोडण्याचा प्रकार सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीकडे तगडे उमेदवार होते. त्यामुळे काही जणांना थांब म्हणावं लागतं. अशा लोकांना भेटून त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची आश्वासनं दिली गेली.' असं राजू शेट्टी म्हणाले.

'संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्तेतून बाहेर पडावं लागेल'

'संघटना की सत्ता असा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळी सदाभाऊंना यांना त्यापैकी एकाची निवड करावी लागेल. संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्ता सोडावी लागेल. सदाभाऊ हे चळवळीतून आले आहेत. त्यामुळे असा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी ते नक्कीच संघटनेला महत्व देखील अशी आशा आहे.' असंही राजू शेट्टी म्हणाले.

VIDEO:



संबंधित बातम्या:

सदाभाऊंचा मुलगा राजकीय आखाड्यात, थेट जयंत पाटलांशी टक्कर