Jemimah Rodrigues club membership cancelled in Mumbai : भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिग्ज ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महिला टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर ती टीकाकारांच्या निशाण्यावर होती. रॉड्रिग्जला 4 डावात एकदाही 30 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. तिने 13, 23, 16 आणि 16 धावा केल्या. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. आता जेमिमासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने तिचे सदस्यत्व रद्द केले आहे.
जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांच्या एका कृत्यामुळे खार जिमखान्याने हे पाऊल उचलले आहे. तिचे वडील इव्हान यांच्यासह काही सदस्यांनी क्लबच्या जागेचा धार्मिक कार्यासाठी वापर केल्याने खार जिमखाना अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. जेमिमाच्या वडिलांनी क्लबच्या अध्यक्षीय सभागृहामध्ये दीड वर्षाच्या 35 धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. क्लबच्या नियमांचे उल्लंघन असून या कार्यक्रमाचा उद्देश धर्मपरिवर्तन करणे हा होता यामुळे क्लबच्या सदस्यांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी खार जिमखान्याने रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. यामध्ये जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी म्हणाले, "जेमिमा रॉड्रिग्सला दिलेले तीन वर्षांचे मानद सदस्यत्व 20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार रद्द करण्यात आले.''
जेमिमा रॉड्रिग्सची कारकीर्द
जेमिमा रॉड्रिग्सने 2018 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तिने आतापर्यंत 3 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले आहेत. 3 कसोटीत तिने 58.75 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. या कालावधीत तिने 3 अर्धशतके झळकावली आहेत. जेमिमाने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांच्या मदतीने 710 धावा केल्या आहेत. तिचे सरासरी 27.30 आहे. जेमिमाला सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तिने 104 सामन्यात 29.75 च्या सरासरीने आणि 114.17 च्या स्ट्राईक रेटने 2142 धावा केल्या आहेत. जेमिमाच्या नावावर 11 अर्धशतके आहेत.
हे ही वाचा -