पुणे: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे, अशातच अनेक नेते विधानसभेत उमेदवारी मिळावी यासाठी नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जुन्नक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होत्या. या चर्चां सुरू असतानाच अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या चर्चांना आज पुर्णविराम मिळाला आहे. 


अतुल बेनकेंनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म 


आज अजित पवारांच्या पक्षाचे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अखेर अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म घेतला आहे. यामुळे आता मागच्या काही दिवसांपासून अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जातील अशी चर्चा होती, त्याला पुर्णविराम मिळाला आहे. अतुल बेनके यांनी काल (सोमवारी) अजित पवार यांची भेट घेऊन एबी फॉर्म घेतला त्यामुळे इतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाने आज 20 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप


राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाने काल (सोमवारी) 20 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती आहे. यामध्ये बारामतीतून अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर) आणि अण्णा बनसोडे (पिंपरी) यांचा समावेश आहे.


काही दिवसांपुर्वी भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर दोन दिवसांमध्येच अजित पवारांनी यादी जाहीर न करताच उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करून दिले. अजित पवार गटाने सोबत आलेल्या सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.


पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेले उमेदवार


अजित पवार - बारामती, छगन भुजबळ- येवला, दिलीप वळसे पाटील- आंबेगाव, चेतन तुपे - हडपसर, सुनील टिंगरे- वडगाव शेरी, अतुल बेनके- जुन्नर, हसन मुश्रीफ- कागल, धनंजय मुंडे- परळी, नरहरी झिरवाळ - दिंडोरी, अनिल पाटील-अंमळनेर, धर्मरावबाबा आत्राम-अहेरी, अदिती तटकरे- श्रीवर्धन, संजय बनसोडे - उदगीर, दत्तात्रय भरणे - इंदापूर, माणिकराव कोकाटे - सिन्नर, हिरामण खोसकर- इगतपुरी, दिलीप बनकर- निफाड, सरोज अहिरे - देवळाली, अण्णा बनसोडे- पिंपरी तसेच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित.


'साहेबांचा आशीर्वाद आहे वेळ आल्यावर...'


महाराष्ट्रात कुठं असं घडलं नाही. मात्र, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने पुढे जाणार कारण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं आहे. उद्यापासून ओझरला अभिषेक करून प्रचाराला सुरुवात करणार आहे, आता काय मागे हटायचे नाही. आपण सर्व जण एक दिलाने एक विचाराने पुढं जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे झाले नाही मात्र, जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघपणाने पुढे जाण्यात यश प्राप्त करेल. जुन्नर तालुक्यात सब एक है. आम्ही एक विचाराने पुढे जाणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये घड्याळ म्हणून हा पक्ष पुढे जाणारच आहे. मात्र, शरद पवार ही हात माझ्या पाठीमागे उभा आहे. तो कसा आहे ते वेळ काळ आल्यावर सांगेल असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. याबाबत अद्याप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणतही भाष्य किंवा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच बेनकेंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर वारंवार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली होती