चेन्नई: चेन्नई कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडवर 3-0 नं आघाडी घेतली आहे.


भारत आणि इंग्लंडनं या सामन्यासाठी संघात दोन-दोन बदल केले आहेत. टीम इंडियाचा फॉर्मात असलेला अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला सामन्याआधी सरावात दुखापत झाल्यानं वगळ्यात आलं आहे. जयंतनं मुंबई कसोटीत शानदार शतक ठोकलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला चेन्नई कसोटीला मुकावं लागलं आहे.
तर मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारऐवजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई कसोटीत शमीच्या जागी भुवनेश्वरचा समावेश करण्यात आला होता. पण त्या सामन्यात भुवीला छाप पाडता आली नव्हती.

दरम्यान, इंग्लंडनंही संघात दोन बदल केले आहेत. लियॉम डॉसननं कसोटीत पदार्पण केलं आहे. तर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीतून सावरला असून त्यानंही संघात पुनरागमन केलं आहे. या दोघांचाही संघात समावेश करण्यात आला असून जिमी आणि वोक्सला आराम देण्यात आला आहे.