काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नवीन नोटा कशा सापडतात?: सुप्रीम कोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 16 Dec 2016 08:17 AM (IST)
नवी दिल्ली: 'काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल कसे काय सापडतात?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. नोटाबंदीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी काल झाली. त्यावेळी कोर्टानं याबाबत सरकारला जाब विचारला. 'लोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत नाही. मग काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नोटा कशा आढळतात?' असा सवालच सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी केंद्र सरकारला विचारला. काही बँकांमधील मॅनेजर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असून संबंधितांवर कारवाई करत असल्याचं अॅटर्नी जनरल यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केलं. दरम्यान, नव्या नोटा जप्त करण्याचं सत्र अजूनही सुरुच आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रातून साडेअकरा कोटी पकडले गेले आहेत यातली बहुतांश रक्कम ही नव्या नोटांची स्वरुपातील आहे.