चेन्नई : टीम इंडियाचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आता सुनील गावसकर यांचा विक्रम खुणावत आहे. एका कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची संधी विराट कोहलीकडे आहे.
एकाच कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक 774 धावांचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. गावसकरांनी त्यांच्या पहिल्याच कसोटी मालिकेत म्हणजे 1971 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर ही कामगिरी बजावली होती.
कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत मिळून 128च्या सरासरीने 640 धावांचा रतीब घातला आहे. त्यामुळे गावसकरांचा 45 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला अजून 135 धावांची गरज आहे.
विराट कोहलीने याआधी 2014-2015 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 692 धावांचा रतीब घातला होता. विशेष म्हणजे क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरलाही गावसकरांचा विक्रम मोडता आला नाही. त्यामुळे सचिनला जो विक्रम मोडता आला नाही, तो मोडण्यासाठी आजा विराट सज्ज झाला आहे.