महाराष्ट्राचे जय कवळी यांची बॉक्सिंग फेडरेशनच्या सरचिटणीसपदी निवड
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 03:08 PM (IST)
मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया या नव्या संघटनेच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमतानं निवड झाली आहे. तर स्पाईसजेट एअरलाईन्सचे संचालक उद्योगपती अजय सिंग या संघटनेच्या अध्यक्षपदी मोठ्या फरकानं निवडून आले आहेत. रविवारी मुंबईत बीएफआयच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यात अजय सिंग यांना 49 तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित जैनेन्दर जैन यांना 15 मतं मिळाली. सरचिटणीसपदाच्या लढतीत कवळी यांना 48 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डी गामा यांना बारा आणि राकेश ठाकरन यांना केवळ चारच मतं मिळाली. चार वर्षांपूर्वी जय कवळी बॉक्सिंग इंडिया या संघटनेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पण काही राज्यसंघटनांच्या उठावामुळं कवळी यांना पद सोडावं लागलं होतं. आता चार वर्षांनी नव्या संघटनेच्या स्थापनेमुळं बॉक्सिंगच्या दुनियेत भारताचा वनवास संपेल अशी आशा आहे. या निवडणुकीच्या निकालांविषयी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग समितीनंही समाधान व्यक्त केलं आहे.